ऑक्सिजनबाबत संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या डॉक्टरचे ऑक्सिजनअभावी चेन्नईत निधन


चेन्नई : विविध क्षेत्रात ऑक्सिजनचा उपयोग कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव कमावलेल्या आणि तब्बल सात पेटंट घेतलेल्या मराठमोळ्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. चेन्नईत कोल्हापूरच्या डॉ. भालचंद्र काकडे यांचे वयाच्या 44 वर्षी निधन झाले.

काही दिवसापूर्वी डॉ. भालचंद्र काकडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यात कोरोनाची किरकोळ लक्षणे असल्यामुळे चार दिवस त्यांनी घरातच उपचार घेतले. पण, एक दिवस प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना चेन्नई येथील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. त्यांची प्रकृतीही सुधारली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि ते उपचाराला अतिशय चांगला प्रतिसाद देत होते. पण, मंगळवारी रात्री उशिरा अचानक त्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपल्यामुळे तिथे उपचार घेत असलेल्या दहा जणांचा तडफडून मृत्यू झाला. त्यामध्ये डॉ. काकडे यांचाही समावेश होता.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात डॉ. भालचंद्र काकडे यांनी रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा वापर करुन विविध क्षेत्रात काय करता येईल याचे संशोधन सुरु केले. त्यांनी या संशोधनात सात पेटंटही मिळवली. जपान, अमेरिका येथील फेलोशिपही त्यांना मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय संशोधक म्हणून त्यांचे नाव जगभर झाले होते.

केवळ ऑक्सिजन पुरवठा थांबल्यामुळे ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या या संशोधकाचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचा मृत्यू हा चटका लावणारा होता. त्याच्या अशा निधनामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.