लॉकडाऊन; फिल्म इंडस्ट्रीतील 25 हजार मजुरांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार सलमान खान


बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सिनेसृष्टीशी निगडीत हजारो मजुरांना आर्थिक मदत केली होती. सलमानने आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या आणि धोकादायक लाटेच्या पार्श्वभूमीवर सिनेसृष्टीतील 25 हजार मजुरांना मदत करण्याची घोषणा केली आहे.

25 हजार कामगारांच्या बँक खात्यात 1500 रुपये प्रत्येकी असे एकूण 3.75 कोटी रुपये देऊन मदत करण्याचा निर्णय सलमान खानने घेण्यात आला आहे. या वृत्ताला फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे सरचिटणीस अशोक दुबे यांनी दुजोरा दिला आहे. आम्ही फेडरेशनच्या वतीने मागील वर्षी सलमान खानला 26 हजार गरजू कामगारांची आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँकेचा तपशील पाठविला होता. त्याच्याकडे आधीपासून असलेल्या या नावांपैकी सलमान खानने एकूण 25 हजार लोकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यांत लाईटमॅन, स्पॉटबॉय, मेक-अप आर्टिस्ट, स्टंटमॅन, ज्युनियर आर्टिस्ट यांचा समावेश आहे.

सलमानच्या ‘बिइंग ह्यूमन फाउंडेशन’ या संस्थेकडून पहिल्या लॉकडाऊनच्या काळात जवळपास 2 लाख गरजवंतांना अन्नधान्य पुरवठा करण्यात आला होता. याशिवाय हजारो मजुरांना सलमान खानने आर्थिक मदतही देऊ केली होती. त्यावेळी त्याने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित 23 हजार लोकांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती. यानंतर सलमानने दोन वेळा 1500-1500 रुपयांची आर्थिक मदत केली. अशाप्रकारे सलमानने गेल्या वर्षी इंडस्ट्रीशी संबंधित गरजू लोकांना 15 कोटींची आर्थिक मदत केली होती.

येत्या 13 मे रोजी सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘राधे’ चित्रपट रिलीज होणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट ओटीटी आणि थिएटर दोन्ही ठिकाणी रिलीज होणार आहे. झी एंटरटेनमेन्ट आणि सलमान खान फिल्म्सनं घोषणा केली आहे की, ‘राधे’ चित्रपटातून होणारी सर्व कमाई कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरली जाणार आहे.

अभिनेता सलमान खान याने कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अनेक गरजवंतांना मदतीचा हात दिला. त्याने त्याच्या बिइंग ह्युमन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अनेक भुकेलेल्यांना मदतही देऊ केली. आता हाच भाईजान सलमान यंदाच्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या मदतीला धावला असून, लॉकडाऊन काळातही कार्यरत असणाऱ्या कोविड योद्ध्यांसाठी सलमान पुन्हा एकदा मदतीला धावला आहे.

सलमानच्या स्वयंसेवी संस्थेचा ‘Being Haangryy’ या नावाचा एक फूड ट्रक सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना खाण्याचे पदार्थ, चहा, पिण्याचे पाणी पुरवण्याची सेवा देत आहे. मुंबईत वांद्रे ते जुहू आणि वांद्रे ते वरळी या भागात सध्याच्या घडीला ही सेवा पुरवली जात आहे. मुंबईत सध्याच्या घडीला जोपर्यंत लॉकडाऊन लागू असेल तोपर्यंत पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सना काहीशी उसंत देत त्यांच्यापर्यंत ही सेवा अविरतपणे पुरवली जाईल, असे संस्थेतर्फे सांगण्यात येत आहे.