बहुगुणकारी पपईच्या बिया


पपई हे फळ घरात आणले गेले, की पपई कापल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या बिया खाता येण्यासारख्या नसल्याने सहसा टाकूनच दिल्या जातात. मात्र या बिया आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असून, त्या टाकून न देता यांचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकतो हे जाणून घेऊ या. पपई या फळाचा गर जरी चवीला गोड असला, तरी पपईच्या बिया मात्र चवीला कडू असतात. त्यामुळे पपईच्या बिया खाण्यासाठी या बियांचा कडसरपणा अंगवळणी पडण्यास जरी वेळ लागला, तरी या बियांचे आरोग्यासाठी होणारे फायदे लक्षात घेता या बियांचे सेवन केले जाणे अगत्याचे ठरते. पपईच्या बिया काळ्या रंगाच्या आणि गोलाकार असतात. या बिया ओलसर आणि थोड्या चिकटही असतात. या बियांमध्ये अनेक पोषक तत्वे असून आरोग्याच्या दृष्टीने ही तत्वे अतिशय फायदेशीर आहेत.

पपईच्या बियांमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक मात्रेमध्ये आहेत. यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, आणि कॅल्शियमही मुबलक प्रमाणामध्ये आहे. या बियांमध्ये असलेले ‘पापैन’ नामक एन्झाइम अन्नाच्या पचनासाठी सहायक असते. त्याचबरोबर या बियांमध्ये प्रोटियोलायटीक एन्झाईम्स, अल्कलॉइड्स, आणि इतर पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आहेत. या बियांच्या अतिशय अल्प प्रमाणांत केलेल्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. या बियांमध्ये असलेले फ्लॅवनॉइड्स, आणि फेनोलिक कंपाऊंड्स रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास सहायक आहेत. या बियांच्या सेवानाने लिव्हरशी निगडीत समस्या दूर होतात. लिव्हर सीऱ्होसीस सारख्या आजारामध्ये पपईच्या बिया वाळवून त्यांची पूड लिंबू सरबतासोबत घेतल्याने फायदा होत असल्याचे म्हटले जाते. हा उपाय सातत्याने तीस दिवस केल्याने चांगला फरक आढळून येतो.

किडनीशी संबंधित विकारांवरही पपईच्या बिया उत्तम समजल्या जातात. या बियांच्या अल्प प्रमाणांत केल्या गेलेल्या नियमित सेवनामुळे शरीरातील विषारी घटकांचे प्रमाण कमी होत असल्याने त्यामुळे किडनीशी संबंधित व्याधी उद्भविण्याचा धोकाही पुष्कळ अंशी कमी होतो. कच्च्या पपईच्या बियांचा वापर गर्भनिरोधक म्हणून करण्याची पद्धत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. या बियांमध्ये असलेल्या फायटोकेमिकल्समुळे गर्भनिरोधन करणे शक्य होते. पपईच्या बिया या त्वचेच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त आहेत. या बियांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणामध्ये असल्याने शरीरातील फ्री रॅडीकल्स नाहीसे होण्यासाठी मदत होऊन त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या बियांच्या सेवनामुळे त्वचेवर अकाली उत्पन्न झालेल्या वाढत्या वयाच्या खुणा नाहीशा होऊन चेहऱ्यावरील सुरकुत्या, कोरडेपणा, आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. पपईच्या बियांच्या सेवनाने वजन घटण्यासही मदत होते.

पपईच्या बियांचे सेवन करण्यासाठी पपईच्या एक-दोन बिया पाण्यासोबत घेण्याने सुरुवात करावी. त्यानंतर बियांचे प्रमाण वाढवावे. पपईच्या बिया खाल्ल्यानंतर तोंड कडू होत असल्यास बियांच्या सोबत मधाचे सेवन करावे. पपईच्या बिया वळवून त्याची पूडही सेवन करता येऊ शकते. वाळविलेल्या पपईच्या बिया कमी कडू लागतात. या बियांची पूड सॅलडवर घालून खाता येऊ शकते. दररोज फळांचा ताजा रस घेत असल्यास हा रस बनवितानाही त्यामध्ये पपईच्या बिया घालता येऊ शकतात. पपईच्या बियांचे सेवन अल्प मात्रेमध्ये करायचे असून, गर्भवती महिला, किंवा नुकतीच प्रसूती झालेल्या महिलांनी पपईच्या बियांचे सेवन करू नये. तसेच हृदयरोग, रक्तदाबाच्या रुग्णांनी ही या बियांचे सेवन टाळावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment