
नवी दिल्ली – कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे. ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर, इंजेक्शन, लस आदींचा तुटवडा रूग्णालयांमध्ये निर्माण झाल्याचे दिसत आहे. देशातील अनेक राज्यातील रूग्णालयांमध्ये जागाच उरलेली नसल्यामुळे, रूग्णांची व्यवस्था उपलब्ध होतील त्या अन्य ठिकाणी केली जात आहेत. आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे व ट्विटमुळे सदैव चर्चेत राहणारे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या पार्श्वभूमीवर आज भाजपला एक सल्ला दिला आहे.
भाजपचे दिल्लीतील कार्यालय कोव्हिड सेंटर करा – सुब्रमण्यम स्वामी
कोरोना महामारीमुळे सर्वत्र निर्माण होत असलेली परिस्थिती पाहता, मी पक्षाला सुचवतो की दिल्लीतील आठ मजली पक्ष कार्यालयाच्या इमारतीमधील वरील सहा मजले रूग्णालायत रूपांतरित केले जावेत. अद्यापही भाजपकडे अशोका रोडवरील शासकीय बंगल्यातील जुने कार्यालये आहेत, ज्यांचा पक्षाच्या कामासाठी वापर केला जाऊ शकतो, असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.
सुब्रमण्यम स्वामींनी या अगोदर, देशावर कोरोनाचे संकट नरेंद्र मोदींमुळे ओढावले असून त्यामुळे देश आता अक्षरश: गुडघ्यांवर आला असल्याच्या मथळ्याखालील लेखाची लिंक शेअर करत पंतप्रधान कार्यालयावर निशाणा साधाल्याचे दिसून आले आहे. फेक ट्विटर आयडी बनवून हलकट व्यक्तींवर पैसे वाया घालवण्यापेक्षा पंतप्रधान कार्यालयाने अशाप्रकारच्या टीकेला उत्तर देणे गरजेचे असल्याचे स्वामी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून सर्वच स्तरांमधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भातील केंद्र सरकारचा अंदाज चुकल्याची टीका केली जात आहे. केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारने योग्य पद्धतीने व्यवस्थापन न केल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, औषध आणि लसींचा तुटवडा जाणवत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान कार्यालयाच्या कामावर नाराजी व्यक्त करत नितीन गडकरींच्या हाती करोना लढाईची सर्व सुत्रे सोपवण्यात यावीत अशी मागणी भाजप राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती.
