कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्यविषयक सुविधा वाढवूनच तयारी करावी लागेल – उद्धव ठाकरे


मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असतानाच कोरोनाची तिसरी लाट देखील येणार असल्याचे सूतोवाच आता केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी दिले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय यंत्रणेला तयार राहणे आवश्यक झाले आहे. त्यातच देशात उपलब्ध असलेले लसीचे डोस अपुरे असल्यामुळे कोरोनाचं संकट अधिकच गडद वाटू लागले आहे.

या पार्श्वभूमीवर राघवन यांनी जर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमधून सावरायचे असेल तर कठोर निर्बंध लागू करून त्यांची स्थानिक पातळीवर यशस्वी अंमलबजावणी केली जाणे आवश्यक असल्याची भूमिका देखील मांडली आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे, याविषयी आपली भूमिका मांडली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. तिसऱ्या लाटेचा वेग लसीकरणामुळे मंदावता येईल. त्यामुळे लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. १८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी लोकसंख्या राज्यात आहे. त्यासाठी आपल्याला १२ कोटी डोस लागणार आहेत. एक रकमी हे सर्व डोस खरेदी करण्याची तसेच दिवसाला १० लाख लोकांना लस देण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे. त्यासाठी लस उत्पादकांसोबत चर्चा सुरू आहे. पण, लस पुरेशी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्यविषयक सुविधा वाढवूनच तयारी करावी लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

गेले वर्षभर कोरोनाशी आपण लढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अनेक सुविधा आपण उभ्या केल्या आहेत. राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल. पण सध्या महत्वाची गरज आहे ती ऑक्सिजनची. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी महत्वाची आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. ही चांगली बाब आहे.

राज्यात सध्या मिशन ऑक्सिजन राबविण्यात येत आहे. जिल्ह्याची गरज ओळखून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवावा. कोरोना नियंत्रणात आला तरी गाफिल राहू नका. हा विषाणू घातक आहे. सध्याच्या म्युटेशनचा विषाणू हा जलदगतीने पसरत आहे. त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोरोनावर मात करता येणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.