हवाई बेटावरील जमीन खरेदीमुळे मार्क झुकेरबर्ग अडचणीत

फेसबुकचा सीईओ आणि जगातील पाच नंबरचा धनकुबेर मार्क झुकेरबर्ग याने अमेरिकेतील निसर्गसमृद्ध हवाई बेटावर केलेली जमीन खरेदी वादग्रस्त ठरली असून या खरेदीमुळे मार्क पुढे अडचण आली आहे. मार्कने या बेटांवर पूर्वी ६०० एकर जमीन ३९२ कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर त्याने कुआई आणि पिला द्वीपावर दोन हजार एकर जमीन खरेदी केली असल्याचे समजते.

इतक्या मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी मुळे धास्तावलेल्या स्थानिक नागरिकांनी त्या विरोधात मोहीम सुरु केली आहे. सुमारे १५ लाख पेक्षा जास्त नागरिकांनी मार्क विरुद्ध ऑनलाईन याचिका हस्ताक्षर मोहीम सुरु केली आहे. बाहेरच्या कुणाच्या ताब्यात येथील जमीन गेली तर पुन्हा एकदा येथील जनतेला राजेशाही व्यवस्था सोसावी लागेल अशी त्यांची भीती आहे. त्याचा परिणाम या स्थानिकांच्या आयुष्यावर होणार आहे.

१८९५ पर्यंत या बेटांवर राजेशाही होती. त्यानंतर ही बेटे अमेरिकेत विलीन झाली. सुरवातीला येथे एक मिशनरी जोडपे येऊन राहिले होते आणि १८३७ मध्ये त्यांनी येथे मोठी जमीन ताब्यात घेतली होती. ही जमीन १९७५ मध्ये वायली कॉर्पोरेशनने खरेदी केली आणि आता ही जमीन बाहेरच्या लोकांना विकली जात आहे. मार्क ने खरेदी केलेली जमीन या पैकीच आहे. बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे हवाईच्या संस्कृतीला धोका निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे.