
नवी दिल्ली: भाजपच्या तिकिटावर केरळ विधानसभा निवडणुकीत उभे राहिलेले मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांचा पलक्कड मतदारसंघातून पराभव झाला. या मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार शफी परमबिल पुन्हा विजयी झाले. त्यांचा ७ हजार ४०३ मतांनी विजय झाला आहे.
केरळ विधानसभा निवडणुकीत मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांचा पराभव
भाजपचा केरळमध्ये विशेष प्रभाव नाही. पण मेट्रोमॅन अशी ई. श्रीधरन यांची प्रतिमा आहे. त्यांनी १९७० मध्ये कोलकाता मेट्रोनंतर कोचिन शिपयार्ड, कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो, कोच्ची मेट्रो, लखनऊ मेट्रो या प्रकल्पांचे नेतृत्व केले होते. देशभर एक अभियंता आणि उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. या लोकप्रियतेचा राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपने केरळमध्ये ई. श्रीधरन यांना उमेदवारी दिली होती.
८८व्या वर्षी निवडणूक लढवण्याचा निर्णय मूळचे केरळचे असलेल्या ई. श्रीधरन यांनी घेतला. सक्तीचे धर्मांतर, फसवणूक करुन होणारे धर्मांतर, लव्ह जिहाद हे विषय घेऊन ई. श्रीधरन यांनी प्रचार केला. हे मुद्दे ज्यांना पटले त्यांनी ई. श्रीधरन यांना पाठिंबा दिला, तर ज्यांना पटले नाही अशांनी त्यांचा विरोध केला. निवडणुकीत ई श्रीधरन यांचा ७ हजार ४०३ मतांनी पराभव झाला.
