पंढरपूर मंगळवेढ्याच्या विजयानंतर अजित पवारांवर गोपीचंद पडळकरांची खोचक टीका


सांगली : देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बसून योग्य नियोजन केले. 50 ते 60 हजार मतांनी राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे निवडून येणार असे काहीजण सांगत होते. पण मतदारांनी भाजपच्या या विजयानंतर त्यांना दाखवून दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची टगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला, अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदासंघातील पोटनिवडणुकीचीसुद्धा मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाला. या विजयानंतर गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत प्रतिक्रिया दिली.

आज महाविकास आघाडीचा गर्व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात फोडण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बसून योग्य नियोजन केले. आपला उमेदवार 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची टगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

तसेच त्यांनी पुढे बोलताना भाजपच्या राजकारणाविषयी भाष्य केले. यापुढेसुद्धा भाजपची विजयी घोडदौड कायम राहील असा दावा त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहेत, असे वक्तव्य सुद्धा त्यांनी केले. यावेळी पंढरपूरमध्ये करेक्ट कार्यक्रम करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनतर पुढचा करेक्ट कार्यक्रम करतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहेत. तसे या मतदारसंघाने दाखवून दिल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.