पंजाबला धक्का, उरलेल्या आयपीएल सामन्यांना मुकणार के. एल. राहुल


अहमदाबाद : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात संघर्ष करणाऱ्या पंजाब किंग्सना आणखी एक धक्का बसला आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून केएल राहुलच्या पोटात काल रात्री दुखत होते, यानंतर त्याला औषधे देण्यात आली, यानंतरही त्याला बरे वाटत नसल्यामुळे इमर्जन्सी रूममध्ये राहुलला नेण्यात आले, तिकडे त्याच्यावर टेस्ट करण्यात आली. त्यानंतर या टेस्टमध्ये त्याला तीव्र ॲपेंडिक्स झाल्याचे समोर आले.

केएल राहुलवर या उपचारासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केएल राहुल याच्या प्रकृतीबाबत पंजाब किंग्सने माहिती दिली आहे. पंजाबच्या नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुल नसताना कोणावर देण्यात येईल, याबाबत अजून टीमकडून काहीही सांगण्यात आलेले नाही.

पंजाबची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 7 पैकी 3 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला असून 4 सामने त्यांनी गमावले आहेत. पंजाबचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू मयंक अग्रवालही दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही, त्यामुळे पंजाबला आता हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. केएल राहुल हा आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. 7 सामन्यामध्ये त्याने 66.20 च्या सरासरीने आणि 136.21 च्या स्ट्राईक रेटने 331 धावा केल्या आहेत.