दुध नासल्यानंतर त्यातील पाण्याचा असा करा वापर


सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे अनेकदा दुध गरम करताना किंवा तापविले गेल्यानंतर नासते, किंवा पनीरपासून एखादा पदार्थ करताना दुध, दही घालून किंवा लिंबाचा रस घालून नासविले जाते. अशा वेळी ते नासलेले दुध गाळून त्यातून पनीर बनविता येते, पण पनीर काढून घेतल्यानंतर जे पाणी शिल्लक राहते त्याचे काय करायचे हा आपल्या पुढला प्रश्न असतो. या पाण्याला इंग्रजी भाषेमध्ये ‘व्हे’ म्हटले जाते. या पाण्याचे नेमके करायचे काय हे ठाऊक नसल्याने बहुतेकवेळी हे पाणी टाकूनच दिले जाते. वास्तविक हे पाणी प्रथिनांनी परिपूर्ण, अतिशय पौष्टिक असते. त्यामुळे या पाण्याच्या सेवनाने स्नायुंच्या बळकटीसाठी आवश्यक असलेली प्रथिने आपल्याला मिळतात. या पाण्याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही हे पाणी विशेष उपयुक्त आहे. असे हे बहुगुणकारी ‘व्हे’ कसे उपयोगात आणायचे ते पाहूया.

दुध नासल्यानंतर ते गाळून घेऊन त्यातील पाणी थंड होऊ द्यावे आणि या पाण्याने चेहरा धुवावा. या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा मुलायम आणि नितळ बनण्यास मदत होते. या शिवाय स्नानाच्या पाण्यामध्ये हे पाणी मिसळून त्याने स्नान केल्यानेही त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. त्वचेचे ‘पी एच’ संतुलन सांभाळणारे असे हे पाणी आहे. केसांना शँपू लावण्यापूर्वी ‘व्हे’ केसांमध्ये लावावे आणि दहा मिनिटे राहू द्यावे. त्यानंतर गरम पाण्याने आणि शँपूने केस धुवावेत. व्हे केसांसाठी उत्तम कंडीशनर आहे.

व्हे सेवन करण्यासाठी, पोळ्यांसाठी पीठ मळताना पीठामध्ये व्हे घालावे. त्यामुळे पोळ्या अतिशय चविष्ट आणि नरम बनतात. तसेच फळांचा ताजा रस बनविताना देखील व्हे त्यामध्ये समविष्ट करावे. त्यामुळे फळाच्या रसाची पौष्टिकता आणखी वाढते. तसेच एखादी रसभाजी करताना त्यामध्ये व्हे घातल्यास भाजीची ग्रेव्ही आणखी चविष्ट आणि पौष्टिक होईल. जर खूप जास्त प्रमाणात दुध नासले असेल, तर ‘व्हे’चे प्रमाणही जास्त असते. अशा वेळी या पायामध्ये भात शिजविल्याने किंवा पास्ता शिजविल्याने भाताला व पास्ताला आगळीच चव येते. त्याचबरोबर सूप्स बनविण्यासाठीही या पाण्याचा वापर करता येतो.

Leave a Comment