… तर लसीकरण प्रमाणपत्राप्रमाणे कोरोनाबळींच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो लावा


अमृतसर – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो कोरोना लसीकरण केल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर असल्यामुळे पंजाबमधील एका व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास नकार दिला आहे. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो जबरदस्तीने लावण्यात आल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे.

यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना या व्यक्तीने पत्र देखील लिहिले आहे. यापूर्वी कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असण्यावरुन पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान वाद निर्माण झाला होता. आता पंजाबमधील एका प्राध्यापकाने लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढा, नाहीतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यू दाखल्यांवरही मोदींचा फोटो छापा अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात वृत्त आजतकने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोदींच्या फोटोमुळे लस टोचून घेण्यास दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून निवृत्त झालेल्या प्राध्यापक चमनलाल यांनी नकार दिला आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असल्यामुळे आपण लस घेतली नसल्याचे चमनलाल सांगतात. एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी कोरोनाची लस घेतलेल्या प्रमाणपत्रावर असणे अपेक्षित असल्याचेही चमनलाल म्हणाले आहेत. आपण लसीकरणास पात्र असून पंजाबमधील वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण करणे गरजेचे असल्याचे ७४ वर्षीय चमनलाल यांनी मान्य केले असले तरी या खासगी आणि सामाजिक विरोधामुळे लस घेत नसल्याचे म्हटले आहे.

इतर देशांमधील कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर राजकीय नेत्यांचे फोटो छापलेले नसल्याचेही चमनलाल सांगतात. भारतामध्ये लसीकरण करण्यात आलेल्या लोकांना सत्तेत असलेल्या नेत्याच्या फोटोसहीत प्रमाणपत्र दिले जात आहे, याबद्दल चमनलाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंसाठी सत्ताधारी पक्षच जबाबदार असल्याचा आरोप चमनलाल यांनी केला आहे. कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो पंजाब सरकारने हटवावा अशी मागणी चमनलाल यांनी केली आहे.

मोदी मागील सात वर्षांपासून सत्तेत आहेत. प्रत्येक जागी ते स्वत:ची जाहिरात करताना दिसतात. पंतप्रधानांच्या फोटोची लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर काय गरज आहे. जर मोदींचा फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर लावला जात असेल तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या दाखल्यांवरही मोदींचा फोटो लावण्यात यावा, असेही चमनलाल यांनी आजतकशी बोलताना म्हटले आहे.न