#ResignModiच्या गदारोळानंतर फेसबुकचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असतानाच ऑक्सिजनपासून हॉस्पिटलमधील बेडपर्यंत अनेक अत्यावश्यक गोष्टींची कमतरता जाणवत. त्यातच काही नेटकरी सोशल मीडियावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचा भडीमार करत आहेत. मोदी सरकारवर विविध हॅशटॅग वापरुन टीका होत आहे. याच संदर्भात फेसबुकवरही पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारा हॅशटॅग #ResignModi ट्रेंड होत होता, पण फेसबुकने हा हॅशटॅगच नंतर ब्लॉक केला. यावरुन टीका होण्यास सुरूवात होताच फेसबुकने चूक मान्य केली आणि हा हॅशटॅग पुन्हा रिस्टोर केला आहे.

फेसबुकवर बुधवारी नेटकऱ्यांकडून #ResignModi हा हॅशटॅग ट्रेंड केला जात, असल्याची माहिती आहे. पण, फेसबुकने नंतर हा हॅशटॅग ब्लॉक केल्यामुळे गदारोळ झाला. हा हॅशटॅग ब्लॉक झाल्यानंतर काहींनी हॅशटॅग #ResignModi सर्च करण्यास सुरूवात केली, असता त्यांना या पोस्ट्स आमच्या कम्युनिटी स्टँडर्ड्सचे उल्लंघन होत असल्यामुळे ब्लॉक करण्यात आल्याचा संदेश दिसला. त्यांनतर अनेकांनी हॅशटॅग ब्लॉक केल्यावरुन ट्विटरवरुन तक्रार करण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर काहींनी हा लोकशाहीला धोका असल्याचेही म्हटले. त्यानंतर फेसबुकने काही तासांनी चूक मान्य करत हॅशटॅग पूर्ववत केला.

दरम्यान फेसबुकच्या प्रवक्त्याकडून आमच्याकडून चुकून तो हॅशटॅग ब्लॉक झाला होता, आम्हाला त्यासाठी भारत सरकारकडून कोणतीही सूचना मिळाली नव्हती. आता हॅशटॅग पूर्ववत झाला असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. फेसबुककडून वेगवेगळ्या कारणांमुळे हॅशटॅग ब्लॉक केले जातात. काहीवेळेस मॅन्युअली, पण ऑटोमॅटिक अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित हॅशटॅग ब्लॉक होतात, लेबलशी संबंधित एरर आल्यामुळे तो हॅशटॅग ब्लॉक झाला होता, असे कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, फेसबुकने हा हॅशटॅग बुधवारी रात्री काही तासांसाठी ब्लॉक केला होता. यापूर्वी मंगळवारीही ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नकारात्मक ट्रेंड सुरू होते. जवळपास पाच तास हॅशटॅग ‘फेल्डमोदी’ ट्विटरवर टॉप ट्रेंड होता.