सिडकोचा घर लाभार्थ्यांना मोठा दिलासा; पैसे भरण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, तर 16 महिन्यांची लेट फी रद्द


नवी मुंबई : सिडकोने कोरोनाची स्थिती पाहता लोकांना दिलासा देण्यासाठी घर लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 2018-19 मध्ये 25 हजार घरांची सिडकोने लॉटरी काढली होती. पण बहुतांश लोकांना घर मिळूनही कोरोनामुळे पैसे भरता आले नव्हते. पहिला हफ्ताही न भरल्यामुळे अनेकांवर लॉटरीमध्ये लागलेले घर गमावण्याची वेळ आली होती. पण कोरोनामुळे लोकांची आर्थिक स्थिती खराब झाली. परंतु त्यांच्या स्वप्नातील घरात लोकांना राहायला जाता यावे, यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

घराचा एकही हफ्ता न भरलेल्यांचे घर रद्द न करता, त्यांना 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्यांचे काही हफ्ते बाकी आहेत, त्यांनाही 31 जुलैपर्यंतचा वेळ मिळणार आहे. त्याचबरोबर सिडकोने 16 महिन्यांची लागलेली लेट फी सुद्धा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना काळात सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना, सिडकोने रद्द केलेल्या लेट फीमुळे घर लाभार्थ्यांचे लाखो रुपये वाचणार आहेत.

सिडकोतर्फे महाराष्ट्र शासनाच्या “सर्वांसाठी घरे” धोरणांतर्गत महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत घरांची घोषणा करण्यात आली होती. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सुमारे 25 हजार घरे जाहीर करण्यात आली होती. या योजनेची सोडत पार पडली.

दरम्यान यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करुन पात्र ठरलेल्या अर्जदारांना सदनिकेच्या किंमतीच्या रकमेचा ठराविक हफ्त्यांमध्ये भरणा करण्यासाठी वेळापत्रक देण्यात आले होते. पण त्यानंतर काही अर्जदारांनी एकाही हफ्त्याचा भरणा न केल्याचे तर काही अर्जदारांचे हफ्ते थकित असल्याचे आढळून आले. या अर्जदारांच्या विनंतीवरुन सुरुवातील सदनिकेचे हफ्ते भरण्यासाठी 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या अंतिम तारखेपर्यंतही काही अर्जदार हफ्ते भरण्यास असमर्थ ठरले होते.

महामंडळाच्या गृहनिर्माण योजनेतील तरतुदींनुसार विहित मुदतीत हफ्ते न भरणाऱ्या अर्जदारांचे वाटपपत्र रद्द होऊ शकते. पण कोविड-19 ची महामारी आणि त्यानंतर लागू केलेला लॉकडाऊन यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच या योजनेतील सर्व अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे, या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन सिडको महामंडळाने सदनिकेचा एकही हफ्ता न भरलेल्या आणि उर्वरित हफ्ते थकित असणाऱ्या संबंधित अर्जदारांना हफ्ते भरण्यासाठी 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

तसेच 25 मार्च 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीतील थकित हफ्त्यांवर लागू होणारी लेट फी माफ करणार असल्याचेही जाहीर केले. संबंधित अर्जदारांना या अंतिम मुदतीपर्यंत थकित हफ्त्यांचा भरणा करावा लागणार आहे. या निर्णयामुळे संबंधित अर्जदारांना निश्चितच दिलासा मिळाला आहे.

संबंधित अर्जदारांनी यासाठी सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन, त्यावरील Online Payment या टॅबचा वापर करुन आपल्या थकित हफ्त्यांच्या संपूर्ण रकमेचा भरणा करायचा आहे. दिलेल्या मुदतवाढीचा संबंधित अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.