मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल


मुंबई : अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासाकरता वर्ग करण्यात आला असून हा गुन्हा पोलीस निरिक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. आता यामुळे परमबीर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री परमबीर यांच्यासह ३३ जणांविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.

परमबीर सिंह यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालकांकडे केली आहे. भीमराव घाडगे यांना परमबीर यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी (ऑनलाइन तक्रार) कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. यामध्ये पराग मणेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण ३३ जणांचा समावेश आहे.

कोतवाली पोलिसांनी या तक्रारीवरून तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून, या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलीस करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.