आज ४ वाजल्यापासून सुरु होणार लसीकरणासाठीची नोंदणी!


नवी दिल्ली – येत्या १ तारखेपासून देशभरात सुरु होणाऱ्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी नोंदणी करणे महत्त्वाचे असून आज संध्याकाळी ४ वाजल्यापासून ही नोंदणी प्रक्रिया सुरु होणार असल्याचे आता सरकारने हे स्पष्ट केले आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने हे जाहीर केले होते की कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठीची नोंदणी २८ एप्रिल रोजी सुरु होईल. पण, नोंदणीप्रक्रिया सुरु होण्याची वेळ सरकारकडून अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक लोक रात्री बारा वाजल्यापासून नोंदणी करण्याचा प्रयत्न करत होते. पण नोंद होत नव्हती.


आता या नोंदणीप्रक्रियेची माहिती आरोग्य सेतू या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठीची नोंदणी http://cowin.gov.in या वेबसाईटवर तसेच आरोग्य सेतू आणि उमंग या अॅप्सवर २८ एप्रिल म्हणजे आज संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरु होणार आहे. १ मेपासून किती सरकारी आणि खासगी लसीकऱण केंद्रे लसीकरणासाठी सज्ज आहेत त्यानुसार नागरिकांना लसीकरणासाठीची वेळ देण्यात येईल, असे म्हटले आहे.

१८ वर्षांवरील सर्व नागरिक १ मेपासून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास पात्र असतील, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसंच सर्व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरीक लसीकरणासाठी पात्र होते.