मुख्यमंत्री सहायता निधीत आयुषमान खुराणाची मदत


कोरोनामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यपने पुढाकार घेतला आहे. कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी त्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये आर्थिक मदत केली आहे आणि आपल्या चाहत्यांनीही या संकटाच्या काळात सरकारला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे

सोशल मीडियावर आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा यांनी एक पत्र शेअर केले आहे. ज्यात त्यांनी अशा प्रत्येक भारतीयांचे आभार मानले आहेत, ज्यांनी या संकटातून सतत पीडित लोकांसाठी योगदान देण्यास त्यांना प्रेरित केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, या संकटाला आपण गेल्या एका वर्षापासून सामोरे जात आहोत. या महामारीने आपली मने मोडली, वेदना व दु:ख सहन करण्यास भाग पाडले. आपण सर्वांनी एकमेकांशी ऐक्य साधत, मानवता दाखवत या संकटाचा कसा सामना करावा, हे दाखवून दिले आहे. हे कोरोनाचे संकट आज पुन्हा एकदा आपल्याला धैर्य, प्रतिकारशक्ती आणि एकमेकांना पाठिंबा दाखवण्यास सांगत आहे.


संपूर्ण देशभर लोक शक्य तितक्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ताहिरा आणि मी ज्यांनी अधिक मदत करण्यासाठी आम्हाला प्रेरित केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आम्ही अधिकाधिक लोकांना मदत करण्याचा सतत प्रयत्न केला आहे आणि आता आवश्यकतेच्या क्षणी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमध्ये देखील हातभार लावला आहे.

जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घेत गरजूंना मदत करण्याची विनंती आयुषमान आणि ताहिरा यांनी केली आहे. ही वेळ आहे जेव्हा आपण एक समाज म्हणून पुढे आले पाहिजे आणि एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. सध्या लोकांना मदतीची आवश्यकता आहे आणि आपण सर्वजण स्वतःहून मदत करून आपले योगदान देऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.