‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच देशालाही चालावे लागेल – संजय राऊत


मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच राजधानी दिल्लीलाही चालावे लागेल, असे सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्या पद्दतीने देशाला काम करावे लागेल, असे त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २४ तास काम करत आहेत. प्रत्येक गावात, घरात काय सुरु आहे त्याची माहिती घेत आहेत. महाराष्ट्रात लवकरच परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर आहे, काही राज्यांनी सुरुवातीपासून चाचण्या केल्या नाहीत. अचानक लाटा उसल्यामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथून आकडेवारी यायला लागली आहे. पण मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोरोनाबाधितांची संख्या निम्य्यावर आली आहे. कारण महाराष्ट्रात प्रशासन, राज्य सरकार, स्वत: मुख्यमंत्री सूत्र आपल्या हातात घेऊन गाव पातळीवरही यंत्रणा राबवली जात आहे की नाही हे पाहत असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

राज्यातील सूत्रे हातात ठेवून मुख्यमंत्री सतत काम करत आहेत. कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून यंत्रणा राबवत असतो आणि विजयाकडे नेतो. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची कमी होण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना दिलेच पाहिजे. विरोधकांनी काही काळ टीका करणे बंद करावे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मी वाचले. या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहेत. राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

लॉकडाऊन वाढण्याचे संकेत असल्याच्या प्रश्नावर बोलातना ते म्हणाले की, लॉकडाऊनचा परिणाम मुंबईसारख्या ठिकाणी दिसू लागला आहे. कोरोनाबाधितांची संख्या निम्म्यावर आली आहे. जर रुग्णसंख्या कमी होत असेल तर काही कठोर निर्बंध सरकारने घेतले तर सरकारला पाठिंबा दिला पाहिजे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेशी आपण चांगला मुकाबला केला, दुसऱ्या लाटेत थोडी गडबड झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु असून आपण सर्वांनी सकारात्मकपणे विचार केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बदनामी होत असल्याचे मान्य आहे. पण हा कलंक दूर कारावा लागेल, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

प्रियंका गांधी या राज्याच्या काँग्रेस प्रभारी आहेत. उत्तर प्रदेश खूप मोठे राज्य आहे. त्या राज्याची लोकसंख्या खूप मोठी आहे. संपूर्ण राज्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यात राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन उत्तर प्रदेशला काय मदत करता येईल, हे पहायला पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.