लसीकरणासाठीच्या नोंदणीला सुरुवात होताच काही मिनिटांतच क्रॅश झाला CoWIN चा सर्व्हर


नवी दिल्ली – एक मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्र सरकार सुरुवात करणार असून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना या टप्प्यात लस दिली जाणार आहे. आज दुपारी चार वाजल्यापासून कोविन अ‍ॅपवर यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया सुरु झाली. पण ही नोंदणी सुरु होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अ‍ॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे.

यासंदर्भातील तक्रार अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले आहेत. याबाबत इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, १७ कोटी ८८ लाख भारतीय दुपारी चारच्या सुमारास आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करत होते. आरोग्य सेतू तसेच कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अ‍ॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केले जात असल्यामुळे कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झाल्याचे समजते.

केंद्र सरकारने याआधीच्या टप्प्यांमध्ये सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच सुरुवातीला ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले होते. आता १ मेपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे.