1 मे पासून राज्यातील लसीकरणाला सुरुवात होणार नाही – राजेश टोपे


मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण मोहिमेला देशभरात 1 मे पासून सुरुवात होणार आहे. या लसीकरण मोहिमेचा केंद्र सरकारकडून मोठा गाजावाजा केला जात आहे. त्याचबरोबर सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. पण महाराष्ट्रात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध होणार नसल्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण केले जाणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. पण एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यास 1 मे पासून एवढ्या लसी उपलब्ध होणार नाहीत. लसी कदाचित मे अखेरीपर्यंत मिळू शकतात. त्यावेळी लसीकरण सुरु होऊ शकते, असं राजेश टोपे यांनी सांगितले. राज्याला दिवसाला 8 लाख डोसची गरज आहे. पण राज्याला सध्या 1 लाख डोस मिळत आहेत. लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या तर येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करता येणे शक्य आहे. तेवढी सुविधा राज्यात उपलब्ध असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सध्या सुरु आहे. त्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन थेट लसीची व्यवस्था करण्यात आली आहे. पण तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात कोविन अॅपवरुन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. कोविन अॅपवर नोंदणी केल्याशिवास लस मिळणार नाही. थेट लसीकरण केंद्रावर आल्यास लस मिळणार नसल्यामुळे लस घ्यायची असेल तर कोविन अॅपवर नोंदणी करावीच लागेल, असे राजेश टोपें यांनी स्पष्ट केले. तसेच कोविन अॅपवर नोंदणी न करत उगाच लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले आहे.