व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसंदर्भात उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय


नागपूर – नुकत्याच दिलेल्या एका निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्हॉट्सअॅप अ‍ॅडमिन्सला मोठा दिलासा दिला आहे. एखाद्या ग्रुपमधील मेंबरने पोस्ट केलेल्या आक्षेपार्ह मजकुरासाठी अॅडमिनला दोषी ठरवता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जोपर्यंत आक्षेपार्ह मेसेजमागे काही हेतू किंवा पूर्वनियोजित कटाअंतर्गत ते पोस्ट करण्यात आले नसल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत ग्रुप अ‍ॅडमिनला दोषी ठरवता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

व्हॉट्सअॅप अ‍ॅडमिन प्रकरणातील एफआयआर रद्द करण्याचा निर्णय न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या द्विसदस्यीय विभागीय खंडपीठाने घेतला आहे. गोंदियातील जिल्हा न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या व्हॉट्सअॅप अ‍ॅडमिनविरोधातील खटला न्यायालयाने रद्द केला आहे. एफआयआरमधील आरोप जरी खरे असल्याचे समजले तर उपलब्ध गोष्टी पाहता अर्जदाराने या प्रकरणामध्ये कलम ३५४-अ (१)(४), ५०९ आणि १०७ अंतर्गत गुन्हा सिद्ध होत नाही. तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गतही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

एका व्हॉट्सअॅप ग्रुपमधील महिलांसाठी जुलै २०१६ मध्ये एका मेंबरने अश्लील आणि वादग्रस्त भाषा वापरल्याप्रकरणी ग्रुप अॅडमिनने काही कारवाई केली नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्या व्यक्तीविरोधात आरोप करण्यात आले होते, त्याने अ‍ॅडमिन म्हणून आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या मेंबरला ग्रुपमधून काढले नाही किंवा त्याला महिलेची माफी मागायला सांगितले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप अॅडमिनने या प्रकरणामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये संबंधित प्रकरणामध्ये पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील दोन्ही बाजू ऐकल्यानंतर व्हॉट्सअॅप अॅडमिनला ग्रुपमधील एखाद्या मेंबरने पोस्ट केलेल्या मजकुरासाठी दोषी ठरवता येईल की नाही हा मुद्दा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. व्हॉट्सअॅप कसे काम करते यासंदर्भातील विचार करुन या प्लॅटफॉर्मवर अॅडमिनचे काम काय असते याबद्दल न्यायालयाने सविस्तर विचार करुन आपले मत मांडले.

सामान्यपणे एखादा ग्रुप व्हॉट्सअॅप अॅडमिन हे तयार करतात आणि त्यामध्ये मेंबर्सचा समावेश करुन घेतात. प्रत्येक ग्रुपचा एक किंवा अनेक अ‍ॅडमिन्स असतात. एखादा ग्रुप तयार केल्यानंतर त्या ग्रुपमध्ये कोणाचा समावेश करावा आणि कोणाचा नाही याचे अधिकार अ‍ॅडमिन्सकडे असतात. त्याशिवाय त्या ग्रुपमधील प्रत्येक मेंबर्सची वर्तवणूक ही ज्याचा त्याचा खासगी प्रश्न असतो.

एखाद्या ग्रुपवर पोस्ट करण्यात येणाऱ्या मजकुरामधील माहिती ही व्हॉट्सअॅप अॅडमिनला पोस्ट करण्याआधीच पाहता, तपासता किंवा बदलता येत नाही. पण कायद्याअंतर्गत दोषी ठरवता येईल असा वादग्रस्त मजकूर पोस्ट करणाऱ्या ग्रुपमधील सदस्याला त्याने पोस्ट केलेल्या मेसेजसाठी दोषी ठरवता येईल. पण यासाठी व्हॉट्सअॅप अॅडमिनला दोषी ठरवता येणार नाही.

जोपर्यंत काही ठराविक हेतूने किंवा आधी नियोजित कटाप्रमाणे एखादा मजकूर पोस्ट केल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्या ग्रुपमधील सदस्याने पोस्ट केलेल्या मजकुरासाठी अॅडमिनला दोषी ठरवता येणार नाही. केवळ ग्रुपचा अॅडमिन असल्यामुळे एखादी व्यक्ती दोषी ठरत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच एखादी व्यक्ती जेव्हा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करते, तेव्हा त्या ग्रुपमधील सदस्य काही गुन्हेगारी हेतूने ग्रुपचा वापर करतील असा अंदाज अॅडमिनला आधीच बांधता येत नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.