१५० रुपयांमध्ये लस मिळाली नाही तर आम्ही आंदोलन करु – प्रकाश आंबेडकर


पुणे – ज्या देशांनी आपल्या येथून सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस घेतली. त्या सर्वांना ३ डॉलर ते ५ डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. पण आपल्याच देशात आणि खासकरुन पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना जवळपास ८ डॉलर दराने घ्यावी लागत आहे. हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे? हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

आम्ही या पार्श्वभूमीवर सरकारला आठवड्याभराची मुदत देत आहोत, आम्हाला सरकारकडून मिळणारी ही लस १५० रुपयांत मिळावी. याबाबतचा तसा निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही आठवड्याभरानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलन करू, असा इशारा आज पुण्यात पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

दरम्यान, ‘अ‍ॅडव्हान्स्ड फंडिंग’वर आधारित कोव्हिशिल्ड लशीची आधीची किंमत होती व आता आपल्याला लसीचे उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची असल्याचे सांगून, या लसीची किंमत आधीच्या किंमतीपेक्षा दीडपट ठेवण्याचे देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने समर्थन केले आहे.

एस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड लसीचे आपल्या पुणे येथील केंद्रात उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने या आठवड्याच्या सुरुवातीला लसीची किंमत प्रत्येक मात्रेसाठी ६०० रुपये आणि राज्य सरकारांसाठी, तसेच केंद्र सरकारच्या नव्या करारासाठी ४०० रुपये अशी जाहीर केली होती. सध्या ही कंपनी केंद्र सरकारला विद्यमान पुरवठ्यासाठी प्रत्येक मात्रेला १५० रुपये आकारते.