हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी रेमडेसिवीरसाठी मोडली एफडी


हिंगोली : आपल्यापैकी अनेकांना सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव आलाच असेल. आता रेमडेसिविर इंजेक्शनही याच चाकोरीत अडकल्यामुळे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वतःची मुदत ठेव मोडून एका खासगी वितरकाला 90 लाख रुपये उपलब्ध करुन दिले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा स्टॉक संपला असून जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड कोणी सोसायचा म्हणून अशातच एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हता. आमदार संतोष बांगर यांच्या कानावर ही बाब पडली, त्यांनीही प्रशासकीय चाकोरीला मुरड घालून ऑर्डर देण्याचे प्रयत्न केले. पण यातून काहीच मार्ग निघत नव्हता.

यात अग्रीम देण्यास विलंब होत असल्याचे लक्षात घेता स्वत:च्या फिक्स डिपॉझिटमधील 90 लाखांची रक्कम एका खासगी वितरकास उपलब्ध करुन दिली आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या इंजेक्शनच्या पुरवठ्यानंतर संबंधित वितरकास जिल्हा प्रशासन जेव्हा निधी देईल, तेव्हा तो आमदार बांगर यांना मिळणार आहे. त्यातही ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्यांनी ही तूर्तास उपलब्ध करुन दिली आहे. हे इंजेक्शन्स आता दोन दिवसांत उपलब्ध होतील, अशी आशा आहे.