देशात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होईना


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. काही केल्या नव्या कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. काल दिवसभरात देशात एकूण 3 लाख 52 हजार 991 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा ठरत आहे. त्याचबरोबर 2 हजार 812 कोरोनाबाधितांचा मृत्यू देखील झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या सध्याच्या घडीला 28 लाख 13 हजार 658 वर पोहोचली आहे. देशभरात रविवारी 2 लाख 19 हजार 272 कोरोनाबाधितांनी या संसर्गावर मात केली.

कोरोनाचा वाढता कहर देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये पाहता या भागात प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला आहे. ज्यामुळे दिल्लीत आता 3 मे, सोमवार सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे नागरिकांना पालन करावे लागणार आहे. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच दिली. यावेळी त्यांनी दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्याचाही मुद्दा अधोरेखित केला.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा चढता आलेख कायम आहे. काल दिवसभरात राज्यात 66 हजार 191 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज 61 हजार 450 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आतापर्यंत एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.19 टक्के झाले आहे. राज्यात एकूण 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.