ऑस्ट्रेलियन खेळाडूची ऑक्सिजन पुरवठ्यासाठी PM Cares निधीत ३७ लाखांची मदत


नवी दिल्ली – एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतामध्ये हाहाकार माजवला असताना दुसरीकडे भारतातच इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएल ही स्पर्धा खेळवली जात असल्याच्या मुद्द्यावरुन आता हळूहळू सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे.

आयपीएलच्या आयोजनासंदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण होत असतानाच भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या एक परदेशी खेळाडूने सामाजिक भान जपत ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियन संघातील जलद गती गोलंदाज पॅट कमिन्सने ही मदत केली आहे.


यासंदर्भात एक मोठा मेसेज कमिन्सने लिहिला असून भारत आपला अतिशय आवडता देश असून मी माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना या देशात भेटल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामुळे या संकटाच्या काळामध्ये देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल, असा सरकारचा या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यामागील दृष्टीकोन असल्याचेही कमिन्सनने म्हटले आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदत निधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन कमिन्सने केले आहे.

तसेच आपल्या भावनांना लोकांनी योग्यपद्धतीने वापर करुन त्याचा कामामध्ये वापर केल्यास नक्की बदल घडेल आणि या परिस्थितीवर मात करणे शक्य होईल, असेही कमिन्स म्हणाला आहे. मी केलेली मदत फार नाही, पण त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल अशी मला आशा असल्याचेही कमिन्सने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कमिन्सच्या या ट्विटनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्याचे ट्विट व्हायरल झाले असून ३८ हजार जणांनी ते रिट्विट केले आहे. तसेच ते एक लाखांहून अधिक जणांनी लाईक केले असून हजारो लोकांनी त्यावर कमेंट करत कमिन्सने केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानले आहेत. अनेकांनी कमिन्सकडून इतर खेळाडूंनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.