ज्या हॉस्पिटलची ५० वर्ष सेवा केली तेथेच व्हेटिंलेटर अभावी डॉक्टरचा मृत्यू


लखनौ – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांना रुग्णालयांमध्ये बेड मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. पण रुग्णालयात बेड मिळाल्यानंतर तेथे ऑक्सिजन, रेमडेसिविर, व्हेंटिलेटर या सुविधा मिळतील की नाही याची शाश्वती नाही, अशी स्थिती अनेक राज्यांमध्ये आहे.

उत्तर प्रदेशातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून तेथे देखील दिवसेंदिवस व्हेंटिलेटरची मागणी वाढत आहे. व्हेंटिलेटरसोबत असणारा बेड मिळवणे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एक लढाईच झाली. फक्त सर्वसामान्यच नाही, तर कित्येक डॉक्टरांनाही या परिस्थितील सामोरे जावे लागत आहे.

मागील ५० वर्षांपासून प्रयागराज येथील स्वरुप राणी नेहरु रुग्णालयात ८५ वर्षीय वरिष्ठ डॉक्टर जे. के. मिश्रा काम करत होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याच रुग्णालयात दाखल झाले होते. पण त्यांना जेव्हा व्हेंटिलेटरची गरज होती, तेव्हा त्यांना व्हेंटिलेटरमिळाला नाही आणि पत्नीच्या डोळ्यांसमोर त्यांनी आपला प्राण सोडला. ज्या रुग्णालयाची त्यांनी एवढी वर्ष सेवा केली, त्याच रुग्णालयात सुविधांअभावी मृत्यू होण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली.

१३ एप्रिलला जे. के. मिश्रा यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. त्यांना तीन दिवसांनंतर एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती अजून खालावली. त्यांना व्हेंटिलेटर सुविधा असणाऱ्या बेडवर शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण शहरात एकाही रुग्णालयात सुविधा नव्हती.

एकूण १०० व्हेंटिलेटर रुग्णालयात होते. पण मिश्रा यांच्या आधी दाखल झालेल्या रुग्णांना ते देण्यात आल्याचे रुग्णालयाने सांगितले. मिश्रा यांना कोणत्याही रुग्णालयाचा व्हेंटिलेटर काढून देणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.