जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार ‘एमबीबीएस’ परीक्षा; अमित देशमुख यांची माहिती


मुंबई – आता जून महिन्यात एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा होणार आहेत. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या परीक्षा आता जूनमध्ये होणार असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर येणे-जाणे किंवा अन्य ठिकाणी जाण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व पाहता परीक्षा पुढे ढकलणे शक्य असल्यामुळे, आम्ही हा निर्णय घेतल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील ३५० जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, तसेच १९ एप्रिलला सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.