हळदीचे असेही दुष्परिणाम


वास्तविक हळद ही औषधी, रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी, रक्तशुद्धी करणारी आणि त्वचेसाठी उत्तम मानली गेली आहे. मात्र कोणतेही औषध प्रमाणामध्ये घेतले तरच त्याच्या गुणांनी फायदा होतो, अन्यथा औषधाचे दुष्परिणाम सहन करण्याची पाळी येते. हळदीचेही तसेच आहे. हळदीचे सेवन जो पर्यंत योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणांत केले जाते तोवर ही लाभदायी आहे. मात्र हळदीचे अतिसेवन केले गेल्यास त्यामुळे काही दुष्परिणाम दिसून येण्याचा धोकाही उद्भवतो.

हळद जर स्वयंपाकामधील पदार्थांमध्ये शिजवून खाल्ली जात असेल, तर त्यापासून हानी नाही, मात्र अनेकदा संधिवाताचे रुग्ण हळदीचे सेवन, ती विना शिजविता करीत असतात. अशा वेळी मात्र ही कच्ची हळद अतिप्रमाणात सेवन केली गेल्याने कालांतराने पचनासंबंधी तक्रारी उद्भवू लागतात. त्याचबरोबर क्वचित पित्त, पोटदुखी अशा समस्या ही उद्भवू शकतात. त्यामुळे हळदीचे सेवन दररोज तीन ग्रामपेक्षा अधिक केले जाऊ नये. हळदीमध्ये ऑक्झेलेट्स मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याच्या अतिसेवनाने गॉल स्टोन्सची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ज्यांना गॉल ब्लॅडर संबंधी विकार असतील त्यांनी हळदीचे सेवन योग्य प्रमाणामध्ये करणे अगत्याचे आहे.

हळदीच्या अति सेवनाने रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाबाच्या विकारासाठी ज्या व्यक्ती औषधोपचार घेत असतील त्यांनी हळदीचे सेवन करताना ते योग्य प्रमाणात केले जाईल याची खात्री करावी. हळदीच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोन्सचा धोकाही उद्भवू शकतो. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोन्स किंवा तत्सम समस्या सतावत आहेत, त्यांनी हळदीचे अतिसेवन टाळावे. गर्भवती महिला आणि नुकतीच प्रसूती झालेल्या महिलांनीही हळदीचे अतिसेवन टाळावे. कच्ची हळद खाण्याऐवजी हळद स्वयंपाकातील पदार्थांमध्ये इतर मसाल्यांप्रमाणे शिजवून खाल्ली जावी. त्याचबरोबर कधी पित्त झालेले असताना किंवा मळमळत असताना हळद सेवन केली जाऊ नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment