२००६ साली मुंबईच्या समुद्राचे पाणी अचानक गोड झाले तेव्हा..!


१८ ऑगस्ट २००६ साली मुंबई शहरामध्ये एक मोठी अजब घटना घडली. ही घटना इतकी आश्चर्यचकित करणारी होती, की त्या काळी ही घटना ज्या लोकांनी घडताना पाहिली, त्याच्या स्मरणामध्ये आजही या घटनेच्या आठवणी ताज्या आहेत. घडले असे, की एरव्ही तोंडामध्येही घालता येणार नाही इतके खारट असणारे समुद्राचे पाणी त्या दिवशी अचानक गोड झाले ! समुद्राचे खारे पाणी गोड झाले ही वार्ता पाहता पाहता पसरली, आणि हे आश्चर्य स्वतः होऊन पाहण्यासाठी आणि पाण्याची चव चाखण्यासाठी लोकांची एकच गर्दी उसळली.

माहीम खाडीचे पाणी अचानक गोड झाल्याची खबर कशी वायुवेगाने पसरली, तशी तेथील समुद्रकिनाऱ्यापाशी लोकांनी भरपूर गर्दी केली. जो- तो गोड्या पाण्याची चव घेत, हे आश्चर्य घडले तरी कसे, हा काही दैवी चमत्कार तर नाही, असा विचार प्रत्येकजण आपल्या मनाशी करू लागला. केवळ मुंबईमधेच नाही, तर गुजरात राज्यातील तीथल समुद्रकिनाऱ्याजवळील समुद्राचे पाणी गोड झाले असल्याच्या वार्ता येऊ लागल्या. १८ ऑगस्ट २००६च्या रात्री मकदूम अली माहिमी दर्गाच्या जवळ असलेल्या माहीमच्या खाडीचे पाणी अचानक गोड झाल्याच्या वार्ता येऊ लागल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या जलविभागाच्या वतीने केल्या गेलेल्या चाचण्यांमध्ये समुद्राच्या एरव्ही खाऱ्या असलेल्या पाण्यामध्ये यावेळी मात्र खारटपणाचे प्रमाण अतिशय कमी आढळले.

एव्हाना ही बातमी संपूर्ण शहरभर पसरली असल्याने मध्यरात्रीपासून माहीमच्या खाडीकडे जाणारी लोकांची गर्दी वाढू लागली. गुजरातमध्ये ही हेच दृश्य पहावयास मिळू लागले. अशी घटना हा दैवी चमत्कारच असल्याचे खात्रीशीरपणे लोक बोलू लागले असतानाच, लोकांनी हे गोडे पाणी पिण्याला आणि पिण्यासाठी बाटल्यांमध्ये भरावयास सुरुवात केल्यानंतर मात्र महापालिकेच्या वतीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. हे पाणी जंतूविरहित नसल्याने हे प्यायल्याने यातून अनेक आजार उद्भविण्याची चिंता आरोग्याविभागाला असतानाच लोकांनी मात्र हे ‘दैवी’ पाणी पिण्याचा आणि साठविण्याचा चंग बांधला होता. एक तर जवळपासच्या कारखान्यांमधील सांडपाणी या खाडीमध्ये नेमाने सोडले जात होते, शिवाय इतरही कचरा पाण्यामध्ये भरपूर असतानाही या कशाची तमा न बाळगता लोकांनी हे पाणी पिण्यास सुरुवात केली. सुदैवाने नंतरच्या काळामध्ये या पाण्यामुळे कोणी आजारी पडल्याचे किंवा एकदा आजार फैलाविल्याचे कोणतेही वृत्त समोर आले नाही.

असा चमत्कार नेमका कशामुळे घडला असावा याचे कारण सांगता आलेले नसून, काही शास्त्रज्ञांच्या मते असे होणे संपूर्ण नैसर्गिक असू शकते. त्यावर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस सरासरीच्या पेक्षा जास्त पडला असल्याने पावसाचे मोठ्या प्रमाणावर साठलेले पाणी समुद्रामध्ये येऊन मिसळले असावे, आणि त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा खारटपणा कमी झाला असावा असा वैज्ञानिकांचा कयास आहे. गोड्या पाण्याची घनता खाऱ्या पाण्याच्या घनतेच्या मानाने कमी असल्याने हे पाणी वरच्या आर तरंगले आणि त्यामुळे केवळ गोडे पाणीच येथे असल्याचा भास सर्वांना झाला असल्याचेही वैज्ञानिकांचे म्हणणे होते. ही घटना घडल्याला चोवीस तास उलटून गेल्यानंतर मात्र पाण्याचा गोडवा कमी होत गेला आणि दोन दिवसानंतर पाणी पुन्हा पूर्ववत खारट झाले.

Leave a Comment