मुंबईत आता वाहनांवर स्टीकर लावणे बंधनकारक नाही


मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांअंतर्गत विविध सेवांच्या वाहनांचा समावेश ठराविक प्रवर्गांमध्ये करत त्यांच्यावर लाल, हिरवा आणि पिवळ्या रंगाचे स्टीकर लावण्याचा नियम मुंबई पोलिसांकडून लागू करण्यात आला होता. पण, हा नियम आता मागे घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडूनच देण्यात आली आहे.

वाहनांवर यापुढे रंगीत स्टीकर लावण्याचा नियम बंधनकारक नसला तरीही वाहनांची तपासणी मात्र सुरुच राहणार आहे. लॉकडाऊनचे नियम लागू होताच, वाहनांच्या ये-जा करण्यावर आलेल्या निर्बंधांअंर्गत काही वाहनांना यातून वगळत त्यांना स्टीकर लावण्याचे निर्देश दिले होते.

पोलिसांनी लागू केलेल्या या अटीअंतर्गत लाल रंगाच्या स्टीकरची अट डॉक्टर, वैद्यकिय कर्मचारी, रुग्णवाहिका, वैद्यकिय मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना होती. तर, हिरव्या रंगाचे स्टिकर खाद्यपदार्थ, भाज्या, फळं, किराणा सामान, दुग्धजन्य पदार्थांची उत्पादनं यांसाठीच्या वाहनांवर बंधनकारक होते. या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवांमध्ये येणारे कर्मचारी ज्यांमध्ये नगरपालिका अधिकारी, वीज पुरवठा विभागातील कर्मचारी, बँक कर्मचारी, वकील, माध्यम प्रतिनिधी आणि दुरसंचार विभागात काम करणाऱ्यांनी आपल्या वाहनांवर पिवळ्या रंगाचा स्टिकर लावणे अपेक्षित होते.

स्टिकरच्या या नियमासाठी मुंबई पोलीस आग्रही दिसत होते. काही ठिकाणी खुद्द पोलिसांनीच हे स्टिकर वितरितही केले होते. पण, याच मुद्द्यावरुन नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम दिसून आला. नागरिकांमधील हाच संभ्रम पाहता, अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला.