डॉ. तात्याराव लहाने सात दिवसांत कोरोना बरा करणाऱ्या ‘विराफिन’विषयी म्हणतात…


मुंबई – केंद्र सरकारकडून झायडस कॅडिलाच्या ‘विराफिन’ औषधाला आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. कोरोना गंभीर रुग्णांसाठी ‘विराफिन’ औषधाला देशातील शिखर संस्था असलेल्या ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. सात दिवसांत कोरोना रुग्ण बरा होता. तसेच या औषधामुळे कोरोनाबाधितांना भासत असलेली ऑक्सिजनची गरज कमी होईल, असा दावा कंपनीने केला आहे. राज्याच्या टास्कफोर्सचे प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी या औषधासंदर्भात महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

कंपनीने विराफिन औषध 91.05 टक्के प्रभावी असल्याचे सांगितल्यामुळे कोरोनाबाधित सात दिवसांत बरा होता. तसेच या औषधामुळे कोरोनाबाधिताला भासत असलेली ऑक्सिजनची गरज कमी होईल, असेही कंपनीने नमूद केले आहे. तात्याराव लहाने यावर म्हणाले, कोरोना प्रादुर्भावामुळे चिंताजनक स्थितीत असलेल्या देशातील २५० रुग्णांना विराफिन हे औषध देण्यात आलं आहे. त्यापैकी १० रुग्ण मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील होते. या रुग्णांना विराफिन हे इंजेक्शन दिल्यानंतर ऑक्सिजनची गरज कमी झाल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

दरम्यान हे इंजेक्शन देऊन भागत नसून इतर उपचार सुरू ठेवावे लागतात. इतर औषधांसोबत हे इंजेक्शन दिले तर परिणाम दिसून येतात, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच या संदर्भात केलेल्या अभ्यासातून असेही समोर आले की, विराफिनचे इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णांमध्ये रिकव्हरी वेगाने दिसून आली. पण हे संकट एकट्या विराफिन औषधाने संपत नसल्याचा पुनरोच्चारही डॉ. लहाने यांनी केला.