डीसीजीआयची Zydus Cadila च्या विराफीन औषधाला परवानगी


नवी दिल्ली – देशात गेल्या वर्षभराहून अधिक काळ कोरोनाशी लढा सुरू असून कोरोनासाठीचे लसीकरण देखील या वर्षी जानेवारी महिन्यात सुरू झाले. पण, अद्यापही देशात रोज शेकडो नागरिकांचे जीव कोरोनामुळे जात आहेत. असे असताना कोरोनाच्या लसींसोबतच देशासाठी अजून एक आशेचा किरण दिसू लागला आहे. कोरोनावरील उपचारांसाठी म्हणून Zydus Cadila या कंपनीचं Virafin हे औषध देशात वितरीत करण्यासाठी डीसीजीआय अर्थात ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे.

कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी येत्या काही दिवसांमध्ये हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक असून औषध दिल्यानंतर ७व्या दिवशी कोरोनाबाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

झायडसने या औषधाच्या जाहीर केलेल्या निकालांनुसार, तब्बल ९१.१५ टक्के हे औषध यशस्वी ठरण्याचे प्रमाण आहे. अर्थात, हे औषध दिलेल्या कोरोनाबाधितांपैकी ९१.१५ टक्के रुग्णांचे अहवाल हे ७ दिवसांमध्ये निगेटिव्ह आले आहेत. विराफीनचा एकच डोस द्यावा लागत असून तो इतर आजारांवरील इंजेक्शन्सप्रमाणेच त्वचेच्या खाली द्यावा लागत असल्याचे देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाबाधित विराफीन दिल्यानंतर वेगाने बरे होण्यास मदत होत असल्याचे देखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे. रुग्ण लवकर बरे होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी होते. तसेच, रुग्णाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस देखील कमी होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

जर सुरुवातीच्या काळातच रुग्णाला विराफीन दिले, तर कोरोनाचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होतो. यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. हे औषध अतिशय महत्त्वाच्या काळात भारतात आले असून आम्ही कोरोनाविरोधातील या लढ्यामध्ये त्याच्या मदतीने रुग्णांना साथ देऊ, असे कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल म्हणाले आहेत.