महाराष्ट्राला अदर पुनावाला यांनी सर्वाधिक प्राधान्य द्यावे; चंद्रकांत पाटील


पुणे – सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी लसींसंदर्भात महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे अशी मागणी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी भाजप काय काय उपाययोजना करत आहे, यासंदर्भातील माहिती पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यांनी कशापद्धतीने भाजप नगरसेवकांकडून रुग्णालयांमध्ये बेड्सची सुविधा पुरवली जात आहे, याबद्दलची माहिती दिली.

पत्रकार परिषदेनंतर सीरम संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता चंद्रकांत पाटील यांनी, याबद्दल बोलण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. सीरम यासंदर्भातील उत्तर देऊ शकेल, असे सांगितले. त्यांना पुढे पत्रकारांनी सीरम महाराष्ट्रात आहे आणि पुनावाला कुटुंबाकडे त्याचा कारभार असल्याचे विचारले असता, मी पुनावाला यांना एवढेच आवाहन करु शकतो की त्यांनी महाराष्ट्राला प्राधान्य दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली.

पाटील यांनी यावेळी पुण्यामधील रुग्णालयांच्या बेड्सची संख्या वाढवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचे सांगितले. पुण्यातील प्रत्येक भाजप नगरसेवकांना आम्ही त्यांच्या त्यांच्या प्रभागातील एखाद्या कोव्हिड सेंटरमध्ये जमेल तेवढ्या बेड्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. या केंद्रांना आम्ही बेड्स आणि इतर सुविधा देऊ.

कोरोना काळानंतर त्या गोष्टी पक्षाकडून रुग्णालयांना भेट म्हणून कायम स्वरुपी वापरण्यासाठी देण्यात येतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले. अशाप्रकारे गुरुवारी आपण पुण्यात तीन रुग्णालयांमधील नवीन बेड्सच्या कक्षांचे उद्घाटन केल्याचे पाटील म्हणाले. नगरसेवक असणाऱ्या रायगुडे यांनी ४५ बेड्स, मनिषा कदम यांनी ३० बेड्स, मंजुषा नागपुरे यांनी २५ बेड्सची सुविधा उपलब्ध करुन दिली. मी संजीवनीमध्ये ४० बेड्स देणार असल्याचे कळल्यामुळे त्यांनी स्वत:हून ३० बेड्स वाढवल्यामुळे तिथे आता ११० बेड्सची सुविधा उपलब्ध असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

आमदार, नगरसेवक कुठे गेले असा लेख आज एका वृत्तपत्रामध्ये छापून आला आहे. ते वृत्तपत्रांना स्वातंत्र्य आहे. पण जी कामे केली जात आहेत, त्याबद्दल पण आवर्जुन लिहा. प्रसिद्धीसाठी नाही तर लोकांचा विश्वास वाढेल म्हणून तरी त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहचू द्या, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना केले. आम्ही पक्षाच्या वतीने एक डॅशबोर्ड सकारात्मक बातम्या शेअर करण्यासाठी सुरु केल्याची माहितीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.