पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय


नवी दिल्ली – कोरोनामुळे देशात पुन्हा एकदा चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अशावेळी हातावर पोट असण्याऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८० कोटी नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे. गरीब जनतेला सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

सरकारने मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजअंतर्गत दर महिन्याला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून दरडोई पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्यात येत होते. या योजनेतील जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात आले होते. तीच स्थिती आता पुन्हा निर्माण झाली असल्यामुळे संकटाच्या काळामध्ये सरकारने पुन्हा एकदा दोन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२० पासून पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा राबवल्यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.