दिलासादायक; राज्यात आज 74, 045 रुग्णांची कोरोनावर मात


मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात 66 हजार 836 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. पण दुसरीकडे मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. आज राज्यात 773 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचे समोर येऊ लागले आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा चढता आलेख कायम आहे. 66 हजार 836 कोरोनाबाधितांची नोंद आज झाली आहे. तर आज 74 हजार 045 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 04 हजार 792 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.81 टक्के झाले आहे.

गेल्या 24 तासात मुंबईत 7199 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 21 हजार 104 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 81 हजार 174 एकूण सक्रिय रुग्ण आहेत.