संगीतकार श्रवण राठोड यांचे करोनाने निधन, नदीम यांनी वाहिली श्रद्धांजली

आशिकी या चित्रपटामुळे सिनेसंगीत क्षेत्रात प्रसिद्धीस आलेल्या नदीम श्रवण जोडीपैकी श्रवण राठोड यांचे मुंबईत २२ एप्रिल रोजी रात्री निधन झाले. त्यांना करोना झाला होता आणि दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना माहीम येथील रुग्णालयात दाखल केले गेले होते. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मिडियावर श्रवण यांच्या निधनाची वार्ता दिली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेने बॉलीवूडला चांगलेच ग्रासल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे श्रवण यांची पत्नी आणि मुलगा यानाही करोना संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल केले गेले आहे. श्रवण यांचे जोडीदार नदीम सैफी यांनी श्रवण यांच्या निधनाचे दुःख अनावर होत असल्याचे फोन वरून सांगितले. ते म्हणाले, ‘मेरा शानू नही रहा. आम्ही एकत्र आयुष्य जगलो, यश अपयश एकत्र पचविले, एकमेकांबरोबर वाढलो. आमचा संपर्क कधीच तुटला नाही. आम्हाला कुणीच अलग करू शकणार नाही. या प्रसंगी श्रवण परिवाराबरोबर मला राहता येत नाही. श्रवणचे शेवटचे दर्शन घेता येत नाही याचे फार वाईट वाटते.’

दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले श्रवण यांना मधुमेह होता. करोना संसर्ग फुफुसात पसरला आणि त्यातच त्यांना हृदयाचा त्रास होऊ लागला आणि त्यांची तब्येत गंभीर बनली. त्यांना त्वरित माहीम येथील रुग्णालयात हलविले गेले. दोन दिवस ते आयसीयु मध्ये होते. अखेर तेथेच त्यांची प्राणज्योत मालविली.