राम जन्मभूमी निर्णय देणारे सरन्यायाधीश बोबडे निवृत्त

दीर्घ काळ न्यायालयात प्रलंबित असलेल्या राम जन्म भूमी प्रकरणी निर्णय देणाऱ्या खंडपीठाचा भाग असलेले सरन्यायाधीश शरद बोबडे २३ एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. अयोध्या प्रकरणी नेमल्या गेलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात त्यांचा समावेश होता. या खंडपीठात सामील असलेले आणि निवृत्त झालेले ते दुसरे न्यायाधीश आहेत. यापूर्वी रंजन गोगोई निवृत्त झाले आहेत. बोबडे देशाचे ४७ वे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांनी या पदावर १ वर्ष ५ महिने काम केले. त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश व्हीएन रमण २४ एप्रिल रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.

सरन्यायाधीशांचा निरोप समारंभ हा वेगळा सोहळा असतो. यात सर्व कायदेतज्ञ, न्यायाधीश सहभागी होतात. पण यावेळी करोना मुळे न्यायालयातील दावे सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चालविले जात आहेत. त्यामुळे बोबडे यांचा निरोप समारंभ याच पद्धतीने होईल असे समजते.

२९ मार्च २००२ रोजी शरद बोबडे यांची मुबईच्या उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. १२ एप्रिल २०१३ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. १८ नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. अयोध्या राम जन्म भूमी शिवाय अनेक महत्वपूर्ण निकाल त्यांनी दिले असून म. गांधी यांच्या हत्येची पुन्हा तपासणी करण्याची याचिका बोबडे खंडपीठाने फेटाळून लावली होती.