भारतीय हवाई दलाकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसहित ऑक्सिजन सिलेंडर्स, औषधांचे एअरलिफ्ट


नवी दिल्ली – देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून ऑक्सिजनचा तुटवडा अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. देशातील अनेक राज्यांकडून केंद्राकडे ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वारंवार मागणी केली जात आहे. आता भारतीय हवाई दलाने या संकटकाळात केंद्राच्या मदतीला धाव घेतली आहे. ऑक्सिजन कंटेनर्स, सिलेंडर्स, महत्वाची औषधं, साहित्य आणि कोरोनाशी लढण्यासाठी सरकारला मदत करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे भारतीय हवाई दलाकडून एअरलिफ्ट केले जात आहे.

याबाबत भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) दिल्लीमध्ये रुग्णालय उभे करण्यासाठी आम्ही कोची, मुंबई, विशाखापट्टणम आणि बंगळुरुतून डॉक्टर आणि परिचारिकांना एफरलिफ्ट केले. त्याचबरोबर बंगळुरु येथून डीआरडीओचे ऑक्स्जिन कंटेनर्स दिल्लीमधील कोरोना केंद्रांसाठी एअरलिफ्ट करण्यात आले.

याबाबत माहिती देताना भारतीय हवाई दलाने ट्विट करत म्हटले आहे की, भारतीय हवाई दल कोरोनाविरोधातील लढाईत वेगाने वाहतूक करण्यास मदत करत आहे. वैद्यकीय कर्मचारी, महत्वाची सामुग्री आणि औषधे देशभरातील कोरोना रुग्णालयात सुविधा पोहोचवण्याचे काम सुरु आहे.