बीएसएफची पाक जासूसी कबुतरावर एफआरआर दाखल करण्याची मागणी

देशभरात करोनाचे थैमान सुरु असताना पंजाब मधील अमृतसर जवळील रोरावाला चौकीवरून एक मजेदार बातमी आली आहे. या सीमेवर पहारा देणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाच्या खांद्यावर पाकिस्तानातून आलेले एक कबुतर बसले. प्रसंग इथेच संपला नाही. हे कबुतर पकडले गेले आणि त्याच्याविरुद्ध एफआरआर दाखल केला जावा अशी लेखी तक्रार बीएसएफने पंजाब पोलिसांकडे केली आहे.

मामला असा आहे की, घुसखोरी करून आलेल्या या कबुतराच्या पायाला एक चिट्ठी बांधली होती आणि त्याच्यावर एक नंबर होता. हे कबुतर पाकिस्तानने हेरगिरी करण्यासाठीच पाठविले असा संशय आहे. कागदी चिट्ठीवरील नंबर विषयी अधिक जाणून घेतले जात आहेच. पण पोलिसांना मात्र कबुतर हा एक पक्षी असल्याने त्याच्याविरुध्द एफआयआर दाखल होऊ शकतो का नाही अशी शंका आहे. पोलिसांनी या साठी कायदेतज्ञाचे सहकार्य मागितले आहे. सीमाभागात यापूर्वीही अशी घुसखोरी करून आलेली अनेक कबुतरे पकडली गेली आहेत.

कबुतरांचा वापर हेरगिरीसाठी करण्याची प्रथा खूप जुनी असून अनेक देशांनी अश्या प्रशिक्षित कबुतरांचे थवे त्यांच्या सेवेत तैनात केले होते. आजही अनेक देशात अशी कबुतरे सेवेत आहेत.