पश्चिम बंगालमध्ये सर्वांसाठी कोरोनाची मोफत लस!


कोलकाता – आज एक महत्त्वाची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. आता राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सरकार मोफत लस देणार आहे. त्यांनी ही घोषणा दक्षिण दिनाजपूर भागातल्या एका सभेत बोलताना केली आहे. जे कोणी ५ मेपासून राज्यात पात्र असतील त्या सर्वांना लस पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. नुकतेच लसींच्या नव्या किमतींवरुन ममता यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते.

त्या म्हणाल्या होत्या, एक देश, एक पक्ष, एक नेता भाजपा कायम असे ओरडत असते. पण लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ते लसीची एक किंमत ठरवू शकत नाहीत. प्रत्येक भारतीयाला मोफत लस मिळायला हवी. यासाठी त्यांचे वय, जात, पंथ, स्थळ अशा कोणत्याही मर्यादा नकोत. खर्च केंद्र करो किंवा राज्य, पण भारत सरकारने देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीची एकच किंमत ठरवून द्यायला हवी.

कालच सीरम या लस उत्पादक कंपनीने त्यांच्या कोव्हिशिल्ड या लसीच्या नव्या किमती जाहीर केल्या. त्यानुसार, ही लस राज्य सरकारांना ४०० रुपयांना मिळणार असून खाजगी दवाखान्यांना हीच लस ६०० रुपयांना मिळणार आहे. लसीच्या एका किमतीबाबत ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही लिहिले आहे. देशात सध्या लसीकरण मोहीम राबवली जात आहे.