कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी रद्द केला पश्चिम बंगाल दौरा


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात सुरुच असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्याचा आपला पश्चिम बंगाल दौरा रद्द केला आहे. देशातील मोदींनी उद्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित केली असल्यामुळे हा दौरा रद्द केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरु आहेत. सातव्या आणि आठव्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार होते.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे देशात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. दिल्लीसोबतच देशातील अन्य काही राज्यांनी ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचे सांगितले आहे. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आदेशही दिले आहेत.

ऑक्सिजनच्या कमतरतेच्या बाबतीत अनेक राज्यांना भासत असलेल्या संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी ऑक्सिजनचे उत्पादन वाढवणे, त्याच्या वितरणाचा वेग वाढवणे आणि त्याचा पुरवठा निश्चित करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.