
नवी दिल्ली : ‘कोव्हिशिल्ड’ लसीची किंमत सीरम इन्स्टिट्यूटकडून ठरवण्यात आल्यानंतर गोरखपूरमधील भाजप आमदाराने आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. अदर पुनावाला हे डाकू असून साथीचे रोग कायद्यांतर्गत सीरम इन्स्टिट्यूट केंद्र सरकारने ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. भाजप आमदाराच्या या मागणीनंतर एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड लसीची नवीन किंमत निश्चित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदाराने हे वक्तव्य केले आहे.
भाजप आमदाराकडून अदर पुनावाला यांचा ‘डाकू’ असा उल्लेख
कोव्हिशिल्ड लसीची किंमत सीरमने ठरवल्यानंतर गोरखपूरचे भाजप आमदार डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्यावर निशाना साधला आहे. अग्रवाल यांनी यावेळी आपल्या अकलेचे तारे तोडत अदर पुनावाला यांचा डाकू असा उल्लेख केला आहे. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी केंद्र सरकारने ताब्यात घ्यावी, अशी देखील मागणी केली आहे.
अदर पुनावाला तुम्ही डाकू आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, बी.एल. संतोष, डॉ. हर्षवर्धन यांनी तुमची कंपनी साथ रोग नियंत्रण कायद्यांतर्गत ताब्यात घेतली पाहिजे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
