नाशिक दुर्घटना : मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर


नाशिक – बुधवारी नाशिकमध्ये घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेमध्ये तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्य सरकारकडून या मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. बुधवारी दुपारी छगन भुजबळ यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ही अतिशय दु:खद घटना असून कोरोनाविरोधात लढा सुरू असताना अशी दुर्घटना होणे हे अतिशय दुर्दैवी असल्याचे देखील यावेळी भुजबळ म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


ऑक्सिजन कसा लीक झाला याची चौकशी करणाऱ्या समितीमध्ये एक इंजिनिअरची देखील वर्णी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे. याची चौकशी झाल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही. पण ते शोधणं गरजेचे असून त्यासाठी याची उच्चस्तरीय समितीच्या मार्फत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.

ही घटना अतिशय दु:खद असून नाशिक महानगर पालिकेचं हे झाकीर हुसेन हॉस्पिटल आहे. येथे १५० रुग्णांची क्षमता आहे. तरी देखील दुर्घटनेवेळी रुग्णालयात १५७ रुग्ण होते. त्यापैकी १३१ रुग्ण ऑक्सिजनवर होते. १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. १५७ रुग्णांपैकी ६३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती यावेळी छगन भुजबळ यांनी दिली.