दुकानावर न जाता घरबसल्या आता मोबाईलवरुन मागवा रेशन


नवी दिल्ली : कोरोनाच्या संकट काळात देशासह अनेक राज्यातील नागरिकांचे बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. पण या संकटकाळात रेशन घेण्यासाठी लोकांना दुकानापर्यंत जावेच लागत आहे. असे करणे देखील एकप्रकारे धोका पत्करण्यासारखेच आहे. पण आता तुम्ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरबसल्या ऑर्डर देऊ शकणार आहात. यासाठी सरकारने Mera Ration app नावाचे मोबाईल अ‍ॅप आणले आहे.

सरकारने सुरू केलेल्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा हे मोबाइल अॅप एक भाग आहे. या अ‍ॅपच्या डाउनलोड करण्यापासून रेशन ऑर्डरपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपण सर्वप्रथम आपल्या मोबाइलमधील Google Play Store वर जा. तिथे सर्च बॉक्समध्ये Mera Ration app शोधा.

अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात तुमचा रेशनकार्ड नंबर नोंदवावा लागेल. यासाठी प्रथम अ‍ॅप उघडा. आपल्याला नोंदणीचा ​​पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यामध्ये आपला रेशन कार्ड नंबर टाकून सबमिट बटण दाबा.

नोकरीसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या बऱ्याच लोकांना या मोबाईल अ‍ॅपचा फायदा होणार आहे. इतर शहरांमध्ये त्यांना रेशन दुकानांविषयी माहिती नसते, या अ‍ॅपमध्ये जवळच्या दुकानांबाबतही संपूर्ण माहिती उपलब्ध असेल.

आपल्याला रेशन कधी आणि किती येईल याबद्दलची संपूर्ण माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळेल. तसेच तुम्हाला किती रेशन मिळते ? ही माहिती देखील या अ‍ॅपद्वारे उपलब्ध होईल. या अॅपद्वारे आपल्या मागील व्यवहाराचा तपशील देखील आपल्याला माहित होईल.