जळगाव; पोलीस कारवाईत नष्ट करण्यात आला वापरलेल्या मास्कचा गाद्या बनवणारा कारखाना


जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच रुग्णालयात वापरण्यात येत असलेल्या मास्कचा वापर गाद्या बनवण्यासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुसुंबा गावात गादी बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करत, पोलिसांनी तो नष्ट केला. आपत्ती व्यस्थापन कायद्याअंतर्गत कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाबाधितांची जळगाव जिल्ह्यातील संख्या लाखांच्या वर जाऊन पोहोचल्यामुळे प्रशासनासमोर त्यावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. जनतेची त्याला साथ आवश्यक असताना, काही नागरिक मात्र अतिशय बेजाबदारपणाचे वर्तन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जळगावातील कुसुंबा गावात वापरलेल्या मास्क आणि हॅण्ड ग्लोव्जपासून गादी बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारावर कुसुंबा गावातील महाराष्ट्र गादी भांडार या कारखान्यावर छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी मास्कचा वापर करत गाद्या तयार केल्या जात असल्याचे निदर्शनास आले.

या गाद्या आणि शिल्लक मास्क पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नष्ट केले. या घटनेत गादी कारखाना मालक अमजद अहमद मनसुरी याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत.