कोरोना अलर्ट ! देशात काल दिवसभरात आढळले तब्बल दीड लाखांच्या जवळपास कोरोनाबाधित


नवी दिल्ली – कोरोनाचे थैमान महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतही कायम आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने शुक्रवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली असून, देशातील नागरिकांना खडबडून जागे करणारेच आकडे समोर आले आहेत. २४ तासांत देशात पहिल्यांदाच तब्बल दीड लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून आले असून, ८०० जणांना जीव गमावावा लागला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशावासियांना जेरीस आणले असून, कोरोनाचे प्रचंड वेगाने संक्रमण होत आहे. गर्दी आणि कोरोना नियमाबद्दलची उदासिनता यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गेल्या २४ तासांतील आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल एक लाख ४५ हजार ३८४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७७ हजार ५६७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. २४ तासांत ७९४ म्हणजेच जवळपास ८०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३२ लाख ५ हजार ९२६ एवढी झाली आहे.

शुक्रवारीही महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढीचा आलेख कायम राहिला. दिवसभरात ५८ हजार ९९३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे दिवसभरात ३०१ रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर १.७४ टक्के एवढा असून, आतापर्यंत राज्यात ५७ हजार ३२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण ५ लाख ३४ हजार ६०३ रूग्ण उपचार घेत आहेत.