आरएसएस सरसंघचालक डॉ.भागवत यांना करोना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना करोना संसर्ग झाला आहे. त्यांना नागपूरच्या किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहेत. शुक्रवारी संघाच्या ट्विटरवरून या संदर्भात ट्विट करण्यात आले. त्यानुसार भागवत यांनी ७ मार्च रोजी करोना लसीचा पाहिला डोस घेतला आहे. त्यानंतर त्यांना करोना संसर्गाची सामान्य लक्षणे दिसू लागल्याने त्याची करोना चाचणी केली तेव्हा करोना संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट झाले. भागवत यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले गेले आहे.

दरम्यान महाराष्ट्रात शुक्रवारी करोनाचे ५८९९३ नवे रुग्ण आढळले असून राज्यात करोना संक्रमितांची एकूण संख्या ३२,८८,५४० वर गेली आहे. मुंबईत शुक्रवारी एका दिवसात ९२०० नवे करोना बाधित सापडले असून मुंबईत करोना रुग्णांची एकूण संख्या ५ लाखांवर गेली आहे. शुक्रवारी ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या ११९०९ झाली आहे.