ब्रिटीश प्रिन्स फिलीप यांचे निधन, ७४ वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा अंत

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे शुक्रवारी वयाच्या ९९ वर्षी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. विंडसर पॅलेस मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. तब्येत बरी नसल्याने त्यांनी शाही सेवेतून निवृत्ती घेतली होती. प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांचा विवाह १९४७ साली झाला होता. लग्नानंतर पाच वर्षांनी एलिझाबेथ ब्रिटनची राणी बनली होती.

प्रिन्स फिलीप यांचा जन्म १९२१ मधला. त्याची आई राजकुमारी होती. फिलीप आणि एलिझाबेथ यांची प्रेमकहाणी १९३९ मध्ये सुरु झाली तेव्हा एलिझाबेथ फक्त १३ वर्षाची तर फिलीप १८ वर्षाचे होते. रॉयल नेव्हल टूर साठी एलिझाबेथ गेल्या होत्या तेव्हा तेथे फिलीप नेव्हल कॅडेट होते. पाहिल्याचा भेटीत दिलजमाई झाली आणि त्यानंतर सुरु झाला प्रेमपत्रांचा सिलसिला. शेवटी फिलीप यांनी एलिझाबेथचा हात मागितला. १९४६ साली दोघांचा गुपचूप साखरपुडा झाला आणि वर्षानंतर लग्न झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन शाही घराण्यात झालेला हा पाहिला सोहळा होता. या दोघांचे वैवाहिक जीवन ७४ वर्षांचे होते.

प्रिन्स फिलीप यांनी राणी एलिझाबेथ यांना अनेक राजकीय व सामाजिक आव्हाने पेलण्यास मदत केली होती. बदलत्या काळानुसार शाही पद्धतीत बदल करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. १९५३ मध्ये राणीच्या राज्याभिषेक सोहळ्याचे थेट टीव्ही प्रक्षेपण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. टीव्हीला मुलाखत देणारे ते पाहिले शाही सदस्य होते.

प्रिन्स फिलीप आणि राणी एलीझाबेथ यांच्यात बेबनाव झाल्याच्या अनेक बातम्या वेळोवेळी येत होत्या मात्र दोघांनी शेवटपर्यंत एकमेकांना साथ दिली.