इयत्ता 10 वी, 12 वीच्या परीक्षेचा आगामी 5 दिवसांत निर्णय – वर्षा गायकवाड


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात दररोज हजारोंच्या संख्येने नव्या कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यात उद्योगधंदे, व्यापार यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या राज्यातील वेगवेगळ्या परीक्षांवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे या काळात परीक्षांचे आयोजन करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आगामी 5 दिवसांत इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्या पाठोपाठ नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढत कहर पहाता हा निर्णय घेण्यात आला होता.

परीक्षेच्या सुमारास गेल्या वर्षी सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव यंदाही परीक्षांच्या तोंडावर बळावलेला असल्यामुळे शिक्षण विभागासमोर पुन्हा परीक्षांबाबत पेच निर्माण झाला. नुकताच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय विभागाने जाहीर केला. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या वर्गांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे सद्य:स्थितीत शक्य नाही. विभागाने यापूर्वी विविध घटकांची मते जाणून घेतली असता या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता.