कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल कठोर निर्णय घ्यावेच लागतील – शरद पवार


मुंबई – महाराष्ट्रावर कोरोनाचे ओढावलेले संकट आणि राज्यातील एकंदर घडामोडी पाहता गुरुवारी फेसबुकच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला. सध्याच्या घडीला राज्यातील आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर, नर्स या सर्वांचीच अहोरात्र मेहनत सुरु आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनेही काही कठोर निर्बंध लागू केले आहेत. सध्या राज्यभरातील विविध स्तरांतून कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारच्या ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेला विरोध होत आहे, पण याशिवाय कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काही पर्याय नाही, ही बाब शरद पवार यांनी स्पष्ट केली.

केंद्र सरकारही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची नियमावली लागू करण्यासंदर्भात आग्रही असल्याचे ते यावेळी म्हणाले. देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी आपण संपर्क साधला असून, ज्या काही त्रुटी राज्यात आहेत, त्यावरही काम करण्याबाबत चर्चा केली. ज्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केंद्र सरकार आणि केंद्राची यंत्रणा राज्यांच्या सोबत आणि महाराष्ट्रासोबत असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

कोरोना नियमांच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या निर्बंधांमुळे राज्यातील मोठ्या वर्गात कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. त्याच धर्तीवर बंधने आली की, अस्वस्थता येतेच हा मुद्दा शरद पवार यांनी अधोरेखित केला. या संकटाची झळ कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकाला बसली. उद्योगधंदे बंद झाल्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान झाले, भाजीपाल्यासारखा नाशिवंत शेतमाल घेणाऱ्या शेतकऱ्याला या मालाचं नेमके काय करावे याचा प्रश्न उभा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचेही नुकसान होत आहे. या सर्वातून पुढे जाताना यशसिद्धीचा मार्ग काढायचा असेल तर, या सर्व परिस्थितीला आपण धैर्याने सामोरे गेलेच पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

समाजात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर असणारी सरकारप्रतीची भावना आणि या कोरोनाच्या संसर्गाची भीती पाहता शरद पवार यांनी सर्व घटकांना उद्देशून एक विनंती केली. समाजातील सर्वच घटकांना मी विनंती करतो की, वास्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. नागरिकांच्या जिवीताच्या संरक्षणार्थ काही अपरिहार्ह निर्णय घेतले जावेत आणि ते घेतले जातही आहेत. पण, या परिस्थितीमध्ये सर्वांचेच सहकार्य गरजेचे आहे.

समाजासाठी घेतले जाणारे निर्णय़ पाहता यामध्ये जनतेच्या सहकार्याची नितांत गरज असून, प्रसार माध्यमांपासून, राजकीय नेते, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांना आग्रहाची विनंती करतो की कोरोना काळात राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करा, असे म्हणत राज्यातील जनता यंत्रणेला सहकार्य करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. सोबतच सामुदायिक प्रयत्नांच्या माध्यमातून आपण कोरोनावर नक्कीच मात करु असा दृढ निश्चयही त्यांनी व्यक्त केला.