राफेल प्रकरण : फ्रान्समधील मीडियाच्या दाव्यानंतर काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा


नवी दिल्ली – काँग्रेसने पुन्हा एकदा राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप केला आहे. त्यामुळे राफेलचा हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, भारतीय मध्यस्थाला डॅसॉल्टने राफेल व्यवहारात ५ लाख युरो गिफ्ट म्हणून दिल्याचे वृत्त फ्रान्समधील मीडियाने दिले आहे. काँग्रेसने आता यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. २०१८ मध्ये याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले सगळे ट्विट्स खरे होते, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. तसेच, याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी चौकशी जाहीर केली पाहिजे, अशी देखील मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.


फ्रान्सच्या पब्लिकेशन मीडियापार्टने दावा केला आहे की, जेव्हा भारत-फ्रान्स यांच्यात २०१६ मध्ये राफेल लढाऊ विमानाबाबत करार झाला, त्यानंतर भारतात एका मध्यस्थाला डॅसॉल्टने ही रक्कम दिली. जेव्हा या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा फ्रान्सच्या अॅण्टी करप्शन एजन्सीने डॅसॉल्टच्या खात्यांचे ऑडीट केले, असे काँग्रेसने ट्विटद्वारे म्हटले आहे.

तसेच, २०१८ मध्ये जी भूमिका राहुल गांधींनी मांडली, की राफेलमध्ये फार मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झाला. देशात ही गोष्ट त्यावेळेस तितक्या पद्धतीने बाहेर येऊ शकली नाही. परंतु आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट झाले आहे की, २०१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात जे राहुल गांधींचे ट्विट्स होते ते सगळे सत्य असल्याचे आज आंतरराष्ट्रीय मीडियाने स्पष्ट केले आहे. फ्रान्समध्ये यावरून खळबळ उडालेली आहे. या निमित्त २८४ कोटींपेक्षा जास्त दलाली घेतल्याचे समोर आले आहे आणि सत्य हे सत्य आहे. राफेलमध्ये रेसकोर्स रोडपर्यंत हा मार्ग गेलेला होता भ्रष्टाचाराचा हे आता पुन्हा एकदा या निमित्त स्पष्ट झालेले आहे. आतातरी दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी पंतप्रधानांनी चौकशी जाहीर केली पाहिजे, असे काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.